मोठी बातमी: WTC फायनलमधील मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार रोहितची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती?

भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023च्या विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. 209 धावांच्या मोठ्या पराभवानंतर 10 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे स्वप्नही भंगले. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) इतका खजील झाला की त्याने एक भावनिक पोस्ट लिहून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर रोहितच्या नावाची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 234 धावांवर गारद झाली. अशाप्रकारे भारतीय संघ 209 धावांनी पराभूत झाला आणि रोहितच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकू शकला नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा दु:खी झाला. संपूर्ण टीम निराश झाली. यात शंका नाही. पण या पराभवानंतर रोहित निवृत्त झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला (Rohit Sharma Test Retirement) जात आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
रोहितच्या नावाने एका ट्वीटर हँडलवरुन कसोटी निवृत्तीची पोस्ट शेअर करण्यात आली आहे.  गेल्या 7 वर्षात रात्रंदिवस मेहनत करून टीम इंडियासाठी मनापासून काम केले. मी प्रत्येक निर्णयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. कर्णधार म्हणून चढ-उतार आले, पण हार मानली नाही. मला माहित आहे की ही योग्य वेळ नाही, परंतु हे माझे हृदय आहे आणि त्याचा विश्वासघात करू शकत नाही. यासोबतच या पोस्टमध्ये एमएस धोनी आणि विराट कोहलीसह सर्वांचे आभारही मानले गेले.

मात्र ही पोस्ट खोटी आहे. रोहित शर्माने कोणतीही निवृत्तीची पोस्ट लिहिलेली नाही किंवा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही त्याने असे काही सांगितले नाही. ही खोटी पोस्ट ट्विटरच्या @ImR0hitt45 खात्यावरून केली गेली आहे. परंतु रोहित शर्माचे अधिकृत ट्विटर हँडल @ImRo45 आहे. म्हणजेच ही व्हायरल पोस्ट खोटी आहे.