सेकंडहँड गाडी घेताय ? गाडी आपल्या नावावर करून घेताना विमा पॉलिसीही आपल्या नावावर करून घ्या , अन्यथा !

सेकंडहँड गाडी घेताना ग्राहक गाडी आपल्या नावावर करणे जितके महत्वाचे मानतो, तितकाच विमाही ही महत्वाचा मानला पाहिजे.विमा कंपनी असा क्लेम मान्य करत नाही कारण गाडीचा नवा मालक आणि कंपनीत कोणताही करार झालेला नसतो. शिवाय ही बाब गाडी विकणार्‍यानेही लक्षात घेतले पाहिजे कारण जर पॉलिसी ट्रान्सफर झाली नाही तर तोही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो.

जेव्हा एखादी व्यक्ती आपली गाडी दुसर्‍या व्यक्तीला विकते त्यावेळी गाडीची सर्व कागदपत्रे त्या व्यक्तीकडे देते. मोटर वाहन कायद्यानुसार कार खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत ग्राहकाने इन्शुरन्स पॉलिसीही आपल्या नावावर ट्रान्सफर करून घेण्याची जबाबदारी वापरलेली कार खरेदी करणार्‍या व्यक्तीची आहे.


चौदा दिवसांनंतरही नव्या मालकाने जर पॉलिसी आपल्या नावावर करून घेतली नाही तर विमा कंपनी थर्ड पार्टी आणि ओन डॅमेज विम्याचा क्लेम देण्यास बांधील राहात नाही. जर विमा ट्रान्सफर झाला नसेल आणि पॉलिसीवर जुन्या मालकाचेच नाव असेल तर अपघात झालेल्या स्थितीत न्यायालय नुकसानीचा क्लेम जुन्या मालकाला पाठवू शकते. विमा कंपनीवर हा क्लेम देण्याची कोणतीही जबाबदारी राहात नाही.

वाहन विमा ट्रान्सफर करण्यासाठी एका नव्या प्रपोजल फॉर्मवर सही करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला विक्रीचे पुरावे द्यावे लागतील,यामध्ये आरसीचे ट्रान्सफर , फॉर्म 29 आणि 30 वर विक्रेत्या मालकाची सही असायलाा हवी. त्याचबरोबर ट्रान्सफर फीचा पुरावा आणि जुन्या पॉलिसीची प्रतही द्यावी लागते. यानंतर विमा कंपनी विमा ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

आरसी नाव बदलायला आरटीओत काही कालावधी जाऊ शकतो. वर उल्लेख केलेली कागपत्रे तुम्ही जमा केली असतील तर पॉलिसी सहजपणे तुमच्या नावावर होईल. आरटीओकडून नवी आरसी मिळाल्यावर त्याची कॉपी विमा कंपनीला दिल्यास क्लेमच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही.