भंडाऱ्यातील महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या – कायंदे

नागपूर : भंडारा जिल्ह्यात असाहाय महिलेवर मदतीच्या बहाण्याने तिघांनी सामुहिक अत्याचार करून निर्वस्त्र अवस्थेत तिला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना 5 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या व घरगुती भांडणातून माहेरी बहिणी सोबत राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेस भंडारा जिल्ह्यातील कारधा जंगलात नेऊन तिघांनी बलात्कार केला, त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

पीडित महिला अत्याचारामुळे व प्रचंड रक्तस्राव झाल्याने बेशुद्धाअवस्थेत आहे. सध्या तिच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना ही दिल्लीतील निर्भया घटने सारखीच आहे. या घटनेनंतर पीडीतेच्या प्रकृतीची चौकशी आणि तपास कार्यातील गती जाणून घेण्यासाठी  शिवसेनेच्या आ. डॉ. मनीषा कायंदे, सुषमा अंधारे व प्रवक्त्या संजना घाडी यांच्या शिष्टमंडळाने आज 7 ऑगस्ट रोजी नागपूरच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पीडीतेच्या प्रकृतीची  व तिच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती घेतली.

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता यांची भेट घेऊन पीडीतेवर सुरू असणाऱ्या उपचार यांची व्यवस्थित माहिती घेतली. त्यानंतर नागपूर- गडचिरोली विभागाचे विशेष महा निरीक्षक श्री संदीप पाटील यांची भेट घेऊन तपासण्या संदर्भात निवेदन दिले.

1) सदर पीडीतेला शासनाच्या मनोधर्य योजनेतून तातडीने आर्थिक मदत व समुपदेशन करण्यात यावे.
2) आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
3) सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून पीडीतेला तात्काळ न्याय देण्यात यावा.
4) भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

याप्रसंगी नागपूर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड , किशोर कुम्हेरिया, नितीन सोळंकी जिल्हा समन्वयक ,  वंदना लोणकर जिल्हा संघटक रामटेक ,  तसेच जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पदाधिकारी उपस्थीत होते.