‘माझ्या हत्येचा कट रचला पण प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा सुरूच ठेवणार’

सांगली : 7 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे असलेल्या साठे चौकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडीत हा वाद उफाळला होता.

त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ ट्विट करत हा हल्ला सुनियोजित होता असा गंभीर आरोप केला आहे. माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूनं 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

विशेष म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना बघायला मिळतात. हा सगळा कट पोलीस सरंक्षणात घडवून आणला जात आहे. सदर घटना थांबवण्याचऐवजी पोलीस चित्रीकरणात मग्न होते, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यानं बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षकचं जर भक्षकात सामील झाले असतील तर विश्वास कुणावरती ठेवायचा असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवेन, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.