उदयनराजे भोसले यांनी दिली ‘चौक’च्या कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप!

सातारा – ‘चौक’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. आता पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे कारण, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले. साताऱ्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘चौक’च्या सर्व कलाकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. ‘चौक’च्या सर्व कलाकारांनी, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

‘चौक’चे लेखक दिग्दर्शक देवेंद्र अरुण गायकवाड यांनी छत्रपतींना टीझर, ट्रेलर व चित्रपटाचे पोस्टर दाखवले, हे पाहून छत्रपती उदयनराजे प्रभावित झाले. त्यांच्या शुभहस्ते ‘चौक’चे मुख्य पोस्टर लॉन्च करण्यात आले. चित्रपटाचा आशय, विषय, कथा या सर्व गोष्टी छत्रपतींनी जाणून घेतल्या. चित्रपटाचा विषय त्यांना आवडला. चित्रपटासाठी एक उत्तम सामाजिक विषय निवडल्याने देवेंद्र गायकवाड यांचे त्यांनी कौतुक केले.

‘चौक’ चित्रपटातील किरण गायकवाड, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे आणि देवेंद्र गायकवाड यावेळी उपस्थित होते. तर, पंकज चव्हाण हे ही यावेळी उपस्थित होते. छत्रपतींनी चित्रपटाच्या सर्व टीमला आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या. ‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट १९ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.