संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना हटवण्यामागे काय आहे भाजपाची रणनीती?

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने नितीन गडकरी यांची संसदीय मंडळातून हकालपट्टी केली आहे. त्याचवेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना केंद्रीय पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध करून देंण्यात आली आहे. या निर्णयाचे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. दोन्ही नेत्यांच्या भवितव्यावर चर्चा सुरू आहे. या प्रकरणी रेकॉर्डवर कोणीही काहीही बोलले नसले तरी त्यांच्या काही वक्तव्यामुळे नितीन गडकरी यांना संसदीय मंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची आतून चर्चा आहे.

केंद्रात हा समतोल राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली आहे असं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे दोघेही ब्राह्मण नेते आहेत आणि दोघेही नागपूरचे आहेत हा निव्वळ योगायोग आहे. अशा रीतीने प्रदेश आणि जात या दोहोंचे समीकरण जपले जाते. हायकमांडचे म्हणणे ऐकून घेत असल्याने फडणवीस हे हायकमांडची पहिली पसंती असल्याचे भाजपमधील एका वर्गाचे मत आहे. मात्र, महाराष्ट्रातील 116 पैकी 80 भाजप आमदारांनी फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर नाराजी व्यक्त केली. अशा स्थितीत पक्षाने त्यांना येथे पदोन्नती देऊन त्यांच्यातील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला.

नितीन गडकरी यांना केंद्रीय संसदीय बोर्डातून आणि केंद्रीय निवडणूक समतितीतून बाजूला करुन भाजपाने व्यक्तीकेंद्रित नव्हे तर विचारधारेशी संबंधित पक्ष असेल, असा संदेश दिल्याचेही सांगण्यात येते आहे. पक्षाच्या विस्तारासाठी जेही आवश्यक असेल ते केले जाईल, असा मेसेजही यातून देण्यात आला आहे. दरम्यान, गडकरींचे जाणे आणि फडणवीसांचे आगमन हा निव्वळ योगायोग नसून हा एक मोठा प्रयोग आहे. आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांनाही केंद्रात घेतले जाऊ शकते, तर नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांना महाराष्ट्रात बढती मिळू शकते, अशीही चर्चा आहे. याचा अर्थ आगामी काळात फडणवीस नितीन गडकरींची जागा घेऊ शकतात असे सांगितले जात आहे.