‘चारीमुंड्या चीत करून हा पाटील नाही निघाला तर नावाचा गुलाबराव नाही’; पाटलांचे खडसेंना जाहीर आव्हान

जळगाव – राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी पक्षातल्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे वारंवार दिसून आले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि  शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील या दोघांमध्ये आता कलगीतुरा रंगला आहे.

या दोन्ही नेत्यांनी जाहीर कार्यक्रमात एकमेकांवर टिका केल्याने दोघांमधील वाद पुन्हा एकदा राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.  एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं होतं. तसंच यावेळी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला होता. त्यांच्या यी टीकेला गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथील कार्यक्रमात नाव न घेता अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

“काही लोक माझ्याविषयी नशिराबाद येथे बोलून गेले मात्र ते लपून लढाई करतात. त्यांनी कडाला कडं लावून बोलावं, चारीमुंड्या चीत करून हा पाटील नाही निघाला तर नावाचा गुलाबराव नाही,” असं आव्हानच गुलाबराव पाटील यांनी मंचावरुन बोलताना दिलं.