ऋतुराज बोहल्यावर चढताच कथित गर्लफ्रेंड सायली संजीव म्हणाली, ‘तुमच्यासाठी खूपच…’

महाबळेश्वर : आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवणारा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) शनिवारी (०३ जून) विवाहबंधनात (Ruturaj Gaikwad Wedding) अडकला आहे. ऋतुराज गायकवाडने त्याची मैत्रीण उत्कर्षा पवार (utkarsha Pawar) हिच्याशी लग्न केले आहे. उत्कर्षा देखील एक क्रिकेटर आहे. ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची सदस्य आहे. लग्नानंतर क्रिकेटपटूंसह चाहत्यांकडून ऋतुराज आणि उत्कर्षावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान एका खास व्यक्तीने त्याला शुभेच्छा देत या नवदाम्पत्याचा फोटो शेअर केला आहे. ऋतुराजची कथित गर्लफ्रेंड म्हणून जिच्या नावाची खूप चर्चा झाली, त्या अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा फोटो शेअर करत दोघांना त्यांच्या आयुष्यातील नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या. सायलीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ऋतुराजने शेअर केलेली लग्न समारंभातील फोटोंची पोस्ट शेअर केली. तिने हे फोटो शेअर करताना असे कॅप्शन दिले की, ‘तुमच्यासाठी खूपच आनंदी आहे, अभिनंदन ऋतुराज आणि उत्कर्षा’. अभिनेत्रीने हार्ट इमोजी पोस्ट करत त्या दोघांना या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये टॅगही केले आहे.