३० मार्चला प्रदर्शित होणार ‘घर बंदूक बिरयानी’

मुंबई – झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे (Zee Studios and Nagaraj Poptrao Manjule) निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाचा भन्नाट टिझर काही महिन्यांपूर्वी झळकला होता. पोलीस आणि नक्षलवादी (Police and Naxalites) यांच्यातील चकमक, पळापळी यात दिसत होती. त्यामुळे नेमके या चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून येत्या ३० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत जंगल अवताडे (Hemant Jangal Awatade) दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे (Sayaji Shinde), नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर (Akash Thosar) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटात नेहमीच वैविध्यपूर्ण आणि अनन्यसाधारण विषय हाताळले जातात. त्यांची हीच खासियत घेऊन झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो. या वेळी पुन्हा आम्ही एक नाविन्यपूर्ण विषय घेऊन आलो आहोत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकांना या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. त्याबाबत विचारणाही होत होती. आता लवकरच या सगळ्याची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.”