शिक्षणासाठी घर शेत गहाण ठेवलं, शेतकऱ्यांच पोरं कलेक्टर झालं

माणसाच्या आयुष्यात शिक्षण ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी तुमचं आयुष्य बदलू शकते. शिक्षणामध्ये स्वप्नपूर्ण करण्याची ताकद असते. पण शिक्षणपूर्ण करणे इतके सोप्पे नसते यामध्ये अनेक अडचणी येतात, अनेक संकटे पुढ्यात उभे टाकता. पण यासर्व संकटांना मागे टाकून जो आपली स्वप्न आणि शिक्षण पूर्ण करतो तो यशस्वी होतो आणि त्यांच्याच संघर्ष गाथा जगासमोर येतात. अशीच एक संघर्षगाथा आज आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील एका छोट्या गावातील युवक आयएएस म्हणजेच कलेक्टर होण्याचे स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याला चक्क त्यांचे घर आणि शेती गहाण ठेवावे लागले होते. ही यशोगाथा आहे, माधव गित्ते याची. माधव याने यूपीएससीमध्ये 2019मध्ये 210 क्रमांक मिळविला होता. माधव नांदेड जिल्ह्यातील आहे. माधव यांचे वडील शेती करतात, त्यांची आई तो आणि त्यांची इतर भावंडे देखील त्यांच्या वडिलांना शेतीमध्ये मदत करतात.

माधव यांचे कुटुंब शेती करून कसेबसे उदरनिर्वाह करत पण एक दिवस अचानक माधव यांच्या आईला कॅन्सर या रोगाचे निदान झाले. माधव तेव्हा दहावीमध्ये होता, तो अकरावीत असताना त्यांच्या आईचे अखेर निधन झाले. आईचे अचानक झालेले निधन, उपचारासाठी खर्च झालेले पैसे यामुळे कुटुंब पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे माधवला आता पूर्णवेळ शेती करावी लागली.त्यामुळे त्यांचा अभ्यास थांबला पण शिक्षणाची आस मात्र त्याला शांत बसू देत नव्हती शेवटी त्याने बारावीचा फॉर्म भरला. कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्याला दररोज किमान 22 किलोमीटर इतके अंतर जावे लागत. त्याला बारावीत 56 टक्के गुण मिळाले. त्याने त्यांच्या घरच्या परिस्थितीचा विचार करता त्याने एखादा छोटा कोर्स करण्याचा निर्णय घेतला, ज्यातून त्याला लवकरात- लवकर नोकरी मिळेल आणि तो त्यांच्या कुटुंबाला हातभार लावू शकेल.

त्यांच्या गावातील एका कॉलेजमध्ये नुकताच एक डिप्लोमा कोर्स सुरू झाला होता,त्या कोर्सला फी देखील अत्यंत कमी होती. त्याने त्या कोर्सला अॅडमिशन घेतले. त्याने तीन वर्षांचा डिप्लोमापूर्ण केला, त्या नंतर त्याला पुण्यात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी अॅडमिशन मिळाले. मित्रांकडून पैसे जमा करून अभियांत्रिकीच्या कोर्सला प्रवेश घेतला. पहिल्या वर्षीची फी भरली मात्र पुढची फी भरताना मात्र त्याला घर आणि शेत गहाण ठेवून शिक्षण पूर्ण करावे लागले. माधव उत्तम मार्कसने पास झाला. त्याला एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली नोकरी मिळाल्यानंतर त्याने सर्व कर्ज फेडण्याचे ठरविले. दोन वर्षात त्याने त्यांचे घर, शेती आणि मित्रांकडून घेतलेले सर्व पैसे परत केले. हे सर्व सुरू असताना एकदा त्यांनी यूपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या एका मुलांची मुलाखत पाहिली त्याला मनोमन वाटले आपण देखील यूपीएससी करावे. पण नोकरी सोडून फक्त अभ्यास करणे शक्य नव्हते.

पण त्याने निर्धार केला आपण यूपीएससी करायचे आणि आयएएस बनायचे. शेवटी नोकरी सोडली आणि मित्रांकडून काही पैसे जमा करून थेट दिल्ली गाठले. तिथे काही यूपीएससीचे क्लास केले, कठोर मेहनत घेतली. 2017, 2018 असं दोन वर्ष सलग अपयश आलं पण माधव मात्र जिद्द सोडली नाही. हे सर्व सुरू असताना त्याने अनेक सरकारी परीक्षा दिल्या त्याला तेथे यश देखील मिळाले पण त्याला फक्त आयएएस हीच पोस्ट हवी होती, अखेर 2019 मध्ये त्याला यश मिळाले. माधव म्हणतो अपयश आले तरी खचू नका, करत रहा, करत रहा यश नक्की मिळेल.