इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या सोळावर; आज ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

रायगड – रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी इथं बुधवारी मध्यरात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता सोळा झाली आहे. अजूनही 100 च्या आसपास लोक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनास्थळी काल मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू होतं; शंभरपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि निसरड्या वाटांमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सकाळीच घटनास्थळी पोहचले आणि दिवसभर सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. स्थानिक ग्रामस्थांना भेटून त्यांची विचारपूस केली आणि आवश्यक ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल असं आश्वासनही दिलं. बचाव कार्य आणि वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्याला प्राधान्य दिलं जात असून या दुर्घटनेतील बाधितांचं कायमचं पुनर्वसन करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याबरोबर चर्चा केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.दरम्यान, काल रात्री थांबवण्यात आलेलं बचाव कार्य आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. मात्र आजही पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान, राज्यातील ठाणे, रायगड, पुणे आणि पालघर जिल्ह्यात आजही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. (Heavy rain warning in Thane, Raigad, Pune and Palghar districts). मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे रायगड आणि पालघर जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी घोषित केली आहे. रायगड जिल्ह्यातील बहुतेक नद्या दुथडी भरून वाहत असून नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.