‘मलाच ‘त्या’ पदात रस नाही’ असे सांगून साहेब मोकळे झाले आणि राऊत मात्र तोंडावर आपटले!

कोल्हापूर – पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपचा जलवा पाहायला मिळाला आहे. यामुळे विरोधक धास्तावले असून विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक बजावू शकतात अशी काहींना आशा आहे. यातूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar)संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दिल्लीत नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसला  डिवचले होते. UPA कुणाची जहागिरी नाही.  शरद पवार हे भीष्म पितामह आहेत. मी UPA बाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलणार असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, आता या मुद्द्यावर स्वतः शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे. मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्याच पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे,असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पत्रकार हेमंत देसाई यांनी एक फेसबुक पोस्ट केली असून या पोस्टमधून खासदार संजय राऊत यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, यूपीएचे नेतृत्व करण्यात मला रस नाही,असा खुलासा आता शरद पवार यांनीच केला आहे. गेले जवळपास वर्षभर तरी संजय राऊत, हे नेतृत्व पवारांनी करावे अशी प्रचारमोहीम राबवत होते. राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसने देखील ही मागणी पवारांसमक्ष केली होती. मात्र त्यास काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर वर्षभराने ‘मलाच त्या पदात रस नाही’ असे सांगून साहेब मोकळे झाले आणि राऊत मात्र तोंडावर आपटले!