काहींना अक्कलदाढ लवकर आली तरी त्यांची अक्कल आयुष्यभर गुडघ्यातच राहते – मनसे

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

दरम्यान राज ठाकरे यांच्या टीकेला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे. अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? याचा अभ्यास करावा लागेल. भाजप आणि आमच्यात काय झाले हे आम्ही पाहू. तुम्ही तुमचे पाहा. काल शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा वाजत होता. स्क्रिप्टही भाजपचीच होती आणि टाळ्या, घोषणाही भाजपच्याच स्पॉन्सर्ड होत्या, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, राऊत यांनी केलेल्या या टीकेला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे(Gajanan Kale) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काहींना अक्कलदाढ लवकर आली तरी त्यांची अक्कल आयुष्यभर गुडघ्यातच राहते… असा टोला काल यांनी लगावला आहे.