‘पवारसाहेबांच्या घरावरील हल्ल्याचा तपास गृहमंत्री वळसे-पाटील सक्षमपणे करून कडक कारवाई करतील’

मुंबई – आंदोलनाला खतपाणी कुणी घातले… त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली… न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते… याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील (Dilip Valse Patil) सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil)यांनी व्यक्त केली आहे.

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरू होत असून दौर्‍यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी माध्यमांनी त्यांच्या बंगल्यावर संवाद साधला असता पवारसाहेबांच्या घरावरील हल्ला आणि मनसे-भाजपची परिस्थिती यावर त्यांनी भाष्य केले.

पवारसाहेबांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील अगदी खोलात जाऊन माहिती घेत असून योग्य ती कारवाई करत आहेत. या प्रकरणाचा तपास कोणत्या स्टेजला आला आहे याचा नक्की तपशील माहीत नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

पवारसाहेबांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे हा प्रकार घडवण्यामागे कोण होते हे शोधण्याची गरज आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.