टीम इंडिया गमावू शकते विश्वचषक २०२३चे यजमानपद! BCCI संकटात, पण काय आहे कारण?

ICC World cup 2023 BCCI: आयसीसी विश्वचषक २०२३ पुढील वर्षी भारतात होणार आहे, परंतु विश्वचषक आयोजित करण्यावरून बीसीसीआय अडचणीत आहे. आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ चे यजमानपद भारताकडून काढून घेऊ शकते.

एकीकडे आयसीसीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बीसीसीआयवर हल्लाबोल करत असताना, दुसरीकडे भारतीय बोर्ड कराच्या मुद्द्यावरून भारत सरकारशी भांडत आहे. आयसीसीने बीसीसीआयला कराशी संबंधित विवादित समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या कठोर सूचना दिल्या आहेत, असे न झाल्यास आयसीसी आगामी विश्वचषक भारताबाहेर हलवू शकते.

बीसीसीआयचा भारत सरकारसोबतचा कर वाद अजूनही नाही सुटला 
भारताने यापूर्वी २०१६ मध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन केले होते. परंतु बीसीसीआय भारत सरकारसोबत कर विवाद सोडवण्यात अयशस्वी ठरला. त्यानंतर आयसीसीने बीसीसीआयच्या वार्षिक करातून १९० कोटी रुपये कापले होते. वास्तविक, ही पहिलीच वेळ आहे की आयसीसीने कर बिल २१.८४ टक्के म्हणजे $११६ दशलक्षने (रु. ९०० कोटी) वाढवले ​​आहे. जर बीसीसीआय २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारत सरकारला करमाफीसाठी राजी करू शकले नाही, तर बोर्डाला ९०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

भारत २०२३ मध्ये वनडे विश्वचषकाचे भूषवणार आहे यजमानपद 
विशेष म्हणजे, भारत २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी टी२० विश्वचषक २०१६ भारतात आयोजित करण्यात आला होता. तर २०११मध्ये भारताने वनडे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. तथापि, भारताव्यतिरिक्त, वनडे विश्वचषक २०११ बांगलादेश आणि श्रीलंकेत देखील खेळला गेला होता.