‘मी अशा भारतातून आलोय, जेथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री…’

मुंबई : विनोदवीर वीर दास आणि वाद हे समीकरण जुनं आहे. वीर दास संदर्भातील एखादा वाद शमतो तोच नवीन वक्तव्य करून तो पुन्हा चर्चेत येतो. आता देखील अभिनेता वीर दास याने अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये स्टँड अप कॉमेडी शोदरम्यान एक कविता सादर केली. या कवितेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या कवितेत वीर दासने भारतातील महिला आणि देशाच्या प्रतिष्ठेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे अनेकांचे मत आहे. यामुळे सोशल मीडियावर नेटकरी त्याला ट्रोल करत आहे. याशिवाय मुंबई हायकोर्टाचे वकील आशुतोष जे दुबे यांनी वीर दासविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामुळे वीर दास चांगलाच अडचणीत सापडला आहे.

वीर दासने त्याच्या अधिकृत यूट्यूब अकाऊंटवरून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान या कॉमेडी शोच्या व्हिडिओमध्ये वीर दास भारताची आणि येथील महिलांच्या स्थितीची खिल्ली उडवताना दिसत आहे. या व्हिडिओचे शीर्षक COM FROM 2 INDIAS असे आहे. व्हिडिओमध्ये वीर दास म्हणतोय की, ‘मी अशा भारतातून आलोय, जेथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होतो’.

वीर दासविरोधात तक्रार दाखल

वीर दासच्या या वक्तव्यानंतर अनेक भारतीयांकडून संताप व्यक्त करत जोरदार टीका करत आहे. त्याचवेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशुतोष दुबे यांनी वीर दासविरोधात तक्रार दाखल केली आहे. आशुतोष दुबे हे मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर वकील आहेत आणि भाजप-महाराष्ट्र पालघर जिल्ह्यासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. आशुतोष दुबे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून वीर दासविरोधात तक्रार नोंदवल्याची माहिती दिली आहे.आशुतोष दुबे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वीर दास परदेशात भारतीय लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. व्हिडिओमागील हेतू देशातील लोकांमध्ये भीती आणि द्वेष निर्माण करण्याचा असल्याचे दिसतेय. एवढेच नाही तर, वीर दासने पीएम केअर फंडावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणीही केली आहे.

मात्र या चौफेर टीकेनंतर वीर दासने त्याच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली लागली आहे. वीर दासने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक निवेदन जारी करत अमेरिकेत भारताबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. यात त्याने म्हटले की, भारताचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, मला भारतीय असल्याचा अभिमान आहे.