त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत; बच्चू कडू संभाजी भिडेंवर भडकले 

Mumbai –  शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide )यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या गटाने देखील भिडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

दरम्यान, यावर आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या देशात फक्त महात्मा गांधीच नाही, वीर सावरकरांबद्दलही बोललं जातं. राहुल गांधींनी मध्यंतरी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत विधानं केली. आता यांनी महात्मा गांधींबाबत विधानं केली. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन ही विधानं केली जात आहेत. हे चुकीचं आहे, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.

आपली औकात तपासली पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये तुमचं योगदान काय आहे? भिडेजी त्यांच्या वयानुसार स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले असतील. त्यांनी एखादी लाठी स्वातंत्र्यासाठी खाल्लेली नाही. पण महात्मा गांधींबद्दल बोलायला ते विसरले नाहीत. त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, अशा शब्दांत बच्चू कडूंनी आपला संताप व्यक्त केला.