मोदींच्या विरोधात मी निवडणूक लढवेन आणि 100 टक्के निवडून देखील येईल – Ravindra Dhangekar

PM Narendra Modi Vs Ravindra Dhangekar : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणूक (Pune Loksabha Election) लढवणार असल्याची चर्चा अचानक सुरू झाली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा पत्ता नसताना थेट २०२४ च्या पुणे लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

मोदींसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाची चाचपणीसुद्धा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता उत्तरप्रदेशनंतर मोदींचे मिशन महाराष्ट्र असणार का? अशी चर्चा आता सुरु आहे. यातच आता माजी खासदार संजय काकडे यांनी मोदींना लिहलेले एक पत्र देखील समोर आले असून त्यांनी मोदींना पुण्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, एका बाजूला ही चर्चा सुरु होताच कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे दिसत आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे समजते. पुण्यातून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. गेली 9 वर्ष या देशामध्ये ज्या प्रकारचे राजकारण चालले आहे. आपल्या देशामध्ये भांडवलशाहीचे राजकारण सुरु झाले आहे.

जर मला उमेदवारी दिली तर मी 100 टक्के आमच्या नेतृत्वाचा विश्वासाला तडा देणार नाही. पुण्यात मी 30 वर्षे काम करत आहे. मला तिकीट दिलं तर 100 टक्के मी निवडून येईन. हा मला विश्वास आहे. कारण आज अख्खा देश भाजपाला पाडायच्या तयारीत आहे आणि त्यात मोदी आले तर आम्ही त्यांचे स्वागत करु पण निवडणूक आम्ही जिंकू असं रवींद्र धंगेकर म्हणाले.