‘मुख्यमंत्री जनतेच्या 1 नंबर पसंतीला आहेत, ही जनतेने दिलेली शाबासकीच म्हणावी लागेल’

पुणे – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.

वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, तिन्ही पक्षातील धुसफूस,महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता शिवसेनेचे खडकवासला विधानसभा मतदार संघ विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी सरकारच्या वाटचालीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला आज यशस्वी 2 वर्षे पूर्ण झाली या 2 वर्षात सरकारने सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. कोरनाचे संकट, वादळ, पूर परिस्तिथी असे कित्येक संकटांना खंबीरपणे सामोरे जाऊन सर्वांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. तसेच लसीकरणामध्ये देखील महाराष्ट्र अव्वल ठरला आहे आणि मुख्यमंत्री देखील जनतेच्या 1 नंबर पसंतीला आहेत. ही जनतेने दिलेली शाबासकीच म्हणावी लागेल असं पोकळे यांनी म्हटले आहे.