तंत्रज्ञानाभिमुख, वैश्विक व सक्षम सनदी लेखापाल घडविण्यावर ‘आयसीएआय’चा भर : काचवाला

  'आयसीएआय'च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांची विविध घटकांशी चर्चा

पुणे :  सनदी लेखापाल ( CA ) हा अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत योगदान देणारा महत्वाचा घटक आहे. आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यासाठी सीए, तसेच सीए करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने प्रशिक्षण सत्रे आयोजिली जातात. तंत्रज्ञानाभिमुख, वैश्विक दर्जाचे सक्षम सनदी लेखापाल घडविण्यावर ‘आयसीएआय’ भर देत आहे, अशी माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) चेअरमन सीए मुर्तझा काचवाला (CA Murtaza Kachwala)  यांनी दिली.

‘डब्ल्यूआयआरसी’च्या पदाधिकाऱ्यांनी ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेला, तसेच शहरातील विविध संस्थांना भेटी देत भारतीय अर्थव्यवस्था, आगामी अन्दाजपत्रक यासह इतर मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर ‘आयसीएआय’ भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काचवाला बोलत होते. प्रसंगी ‘डब्ल्यूआयआरसी’चे व्हाईस चेअरमन सीए यशवंत कासार, खजिनदार सीए पियुष चांडक, विभागीय समिती सदस्या सीए ऋता चितळे, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, सदस्य सीए प्रणव आपटे, सीए अमृता कुलकर्णी (WIRC Vice Chairman CA Yashwant Kasar, Treasurer CA Piyush Chandak, Divisional Committee Member CA Rita Chitale, Pune Branch President CA Kashinath Pathare, Member CA Pranav Apte, CA Amrita Kulkarni) आदी उपस्थित होते.

सीए मुर्तझा काचवाला यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने जीएसटी आयुक्तालयात प्रधान मुख्य आयुक्त एस. एम. टाटा, प्रवीण कुमार यांच्याशी चर्चा केली. पूना मर्चंट चेंबर, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस यांची भेट घेतली. आयसीएआय भवनमध्ये माजी अध्यक्ष, सीए विद्यार्थी, ‘विकासा’चे पदाधिकारी, पुणे शाखेचे पदाधिकारी यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

सीए मुर्तझा काचवाला म्हणाले,  आगामी वर्षात सीए अभ्यासक्रम बदलत असून, यापुढे सहा पेपर असणार आहेत. तंत्रज्ञान अंतर्भूत केले जात आहे. पुढील वर्षांपासून भारतीय राज्यघटनेचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. सीएना अद्ययावत होण्यासाठी फाउंडेशन पासून सीए फायनलपर्यंत, तसेच सीए झाल्यावर देखील नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट्स पहिल्यांदा भारतात झाली. त्यात जवळपास १५ हजार सीए सहभागी झाले होते

सीए यशवंत कासार म्हणाले,  समाजाला आर्थिक साक्षर करण्यासाठी सीए इन्स्टिट्यूटद्वारे जागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. सीए जागतिक पातळीवर काम करू शकेल, अशा स्वरूपाचे वातावरण तयार होण्यासाठी डब्ल्यूआयआरसी’च्या माध्यमातून काम सुरु आहे.