हे अभ्यासात कच्चे आहेत; शरद पवार-बृजभूषण सिंह यांचे फोटो ट्वीट केल्यावर राऊतांची मनसेनेवर  टीका 

मुंबई – अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत केला. ही रसद शरद पवारांनी पुरवल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता. आता मनसे नेत्यांकडून एक फोटो शेअर करण्यात या फोटोच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे बोट दाखवण्यात आले आहे.

या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार (Sharad Pawar) -सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकत्र पाहायला मिळतायत. मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी काही फोटोज सोशल मीडियात शेअर केले आहेत . राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरुय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे.  दरम्यान मनसेने हे फोटो शेअर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊतांना या फोटोंबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “बृजभूषण सिंह यांना आम्हीदेखील ओळखतो. आम्हीदेखील एकत्र बसतो, जेवतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं…संसदेचा अभ्यास करायला सांगा त्यांना. तिथे लोक एका सभागृहात बसतात, आजुबाजूला असतात. एकत्र चहापान करतात. योगींसोबत आम्हीदेखील चहापान करतो, म्हणून आम्ही काय योगींना त्यांना अडवण्यासाठी रसद पुरवली? हे अभ्यासात कच्चे आहेत”.