भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनची असेल – टोपे

जालना – राज्यात ओमिक्रॉनचे सुमारे 100 रुग्ण झाले असून, ही संख्या झपाट्यानं वाढल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळं भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनची असेल, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. सध्या राज्यात कोरोनाचे 1 हजार 400 च्या आसपास रुग्ण असून, ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळं लोकांनी कोरोना सुरक्षिततेचे नियम पाळणं आवश्यक आहे, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

राज्यात दररोज 6 ते 7 लाख लसीकरण होत असून लसीकरण वाढवण्यात येत आहे, मात्र लोकांनी लसीकरण करून घेणं महत्त्वाचं आहे, तरच लसीकरण शंभर टक्के पूर्ण होईल असंही टोपे म्हणाले. तसंच केंद्र सरकारनं आता बूस्टर डोस देण्याबाबत तातडीनं निर्णय घेणं गरजेचं असून तशी मागणी करण्यात आल्याचंही टोपे यांनी सांगितलं. आकाशवाणीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, राज्यात काल ओमिक्रॉनचे 2 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 110 झाली आहे. हे दोन्ही रुग्ण 50 आणि 33 वर्षांचे पुरुष असून, यातील एकाने दुबईचा प्रवास केला आहे तर दुसरा एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा निकट सहवासित आहे. या दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालेले असून यातील एक लक्षणविरहित आहे तर दुसऱ्याची लक्षणे सौम्य आहेत.

राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु असून, विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 729 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 162 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, 57 रुग्णांचा त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.