यश मिळाले तर हुरळून जाऊ नका, अजितदादांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील पाली, तळा, म्हसळा, माणगाव तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड या नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक यावेळी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार शेखर निकम, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी मार्गदर्शन करताना सर्वप्रथम विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. नवनियुक्त नगरसेवकांची जबाबदारी वाढली आहे. काम करताना कुठे कमी पडलात तर खचून जाऊ नका आणि यश मिळाले तर हुरळून जाऊ नका, असा सल्ला पवार यांनी सर्व उपस्थितांना दिला. राज्यात काम करताना दोन वर्ष संकटात गेली. कोरोना, नैसर्गिक आपत्ती अशा सर्व संकटांना सामोरे जाण्याचे काम आपण केले. यामध्ये कोकणात वादळांमुळे झालेले नुकसान भरून काढण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. कोकण हा निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग असून पर्यटन विकासावर भर देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

रेवस ते रेडी हा सागरी मार्ग पूर्ण केल्यानंतर कोकण भागात मोठा बदल घडेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला. अनेक नगरपंचायतींमध्ये नवनियुक्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष एकाच पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता तुम्ही पक्षाचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष झालेला आहात. त्यामुळे तुमच्या प्रत्येक कृतीवर लोकांचे लक्ष असते. काही चुकीचे झाले तर त्याचा फटका पक्षालाही बसतो. त्यामुळे याची काळजी घेऊन काम करावे, असे मार्गदर्शनही अजितदादा पवार यांनी केले.

रायगड – रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन केले. राज्यात महविकास आघाडी सरकार काम करत आहे. स्थानिक पातळीवर सत्ता स्थापन करताना एकोपा राखण्याचे काम आपण केले. सर्वांनी यात सामंजस्य दाखवले. दापोली-मंडणगड येथील कार्यकर्त्यांनी यात प्रमुख भूमिका बजावली, यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे सुनील तटकरे यांनी आभार मानले. आदरणीय पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना कोकण रेल्वेचे काम पूर्ण झाले. अशाप्रकारे आता अजितदादांच्या नेतृत्वात कोकणातील सागरी मार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिला.

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन केले. याशिवाय या विजयात कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा असल्याने त्यांचेही आभार मानले. या विजयातून स्थानिक विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न नक्की होईल, असा विश्वास व्यक्त केला. यापुढे कोकण विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव अधिक बळकट करण्यासाठी एकत्र काम करू, अशी ग्वाही यावेळी दिली.

या कार्यक्रमादरम्यान पाली, तळा, म्हसळा, दापोली, मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.