गोव्यात नरेंद्र मोदींनी टीका केली काँग्रेसवर; पण ती टीका झोंबली शिवसेनेला

पणजी – गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असून आता प्रचार रंगात आला आहे. निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपल्याने आता सर्वच पक्षांनी जोर लावला असून काल भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हापश्यात जाहीर सभा घेतली.

या सभेत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रसने गोवामुक्ती संग्राम संपवण्याचं काम केलं. स्वातंत्र्यानंतरही गोवा 15 वर्ष कॉंग्रेसमुळे गुलामगिरीत होता. काही तासात जे काम होऊ शकत होते त्या कामासाठी काँग्रेसने 15 वर्षे लावले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की गोव्याच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी सैन्याला पाठवणार नसल्याचे जाहीर केले होते. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम नेहरूंनी केलं अशी टीका मोदी यांनी केली.

गोव्याची वाटचाल ही गोल्डन गोव्याच्या दिशेने सुरू झाली आहे. काँग्रेसच्या काळात 25 लाख पर्यटक यायचे मात्र आमच्या सरकारच्या काळात ही संख्या 80 लाखांवर गेली आहे. पर्यटन वाढल्याने रोजगार देखील वाढू लागला आहे. गोव्यात काँग्रेस नेते फक्त पर्यटनासाठीच यायचे, कॉंग्रेस पक्ष गोव्यातील तरूणांची स्वप्न कधीच समजू शकला नाही असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, आता कॉंग्रेसवर केलेली टीका शिवसेनेला झोंबली आहे. खासदार संजय राऊत हे नेहमीप्रमाणे कॉंग्रेसच्या बाजूने मैदानात उतरले. ते म्हणाले,  “गोवा गोल्डनच आहे, या गोल्डन गोव्यात तुम्ही नंतर आला. गोवा स्वतंत्र झाला, इंदिरा गांधींनी त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला. नेहरुंनी येथे मोठं काम केलंय. गोवा स्वतंत्र झाला तेव्हा आज बोलणारे लोक कुठे होते त्या लढ्यात?” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय. पुढे बोलताना, गोव्याच्या लढ्यात महाराष्ट्र होता, राममोहन लोहिया होते. गोवा मुक्तीसाठी लढणाऱ्या इतर लोकांनी मिळून गोवा स्वतंत्र केलाय, असंही राऊत म्हणाले.