‘असा’ ठरवा पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा, केजरीवालांची भन्नाट आयडिया !

नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. 10 फेब्रुवारीपासून मतदान होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही राजकीय तापमान वाढले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकांपूर्वी एबीपी न्यूज सी वोटरनं पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेतून भाजपची चिंता वाढवणारे आकडे हाती आले आहेत. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार युपीमध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश मिळू शकेल. मात्र त्यांच्या जागा लक्षणीय प्रमाणात घटतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे गोव्यातही भाजप पुन्हा कमळ फुलवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, एबीपी न्यूज सी वोटरनं केलेल्या सर्व्हेमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पार्टीजोरदार मुसंडी मारणार असे दिसत आहे. यामुळे पंजाबचा पुढील मुख्यमंत्री आपचाच असेल फक्त आपच्या नेत्यांपैकी जनतेला कोणता मुख्यमंत्री हवाय, हे लोकांनीच सांगावं, असं आवाहन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केलंय. यासाठी त्यांनी एक फोन नंबरही जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जनतेनं आपल्या नेत्याचे नाव सांगावे. ज्या नेत्याच्या नावाने जास्त कौल येईल, तोच आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

पंजाबमध्ये आपचे सर्वात मोठे नेते भगवंतमान हे असून आपची सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री पदी विराजमान होतील, अशी चर्चा आहे. मात्र याबाबत भगवंतमान म्हणाले, ‘ अनेकदा राजकीय पक्ष जनतेवर मुख्यमंत्री थोपवतात. लोकांना त्यांची सुख-दुःख समजून घेणारा नेता मुख्यमंत्री म्हणून हवा असतो. आपच्या नेत्यांपैकी कुणाला ही जबाबदारी द्यायची हे जनतेलाच ठरवू द्या, असा प्रस्ताव मी केजरीवाल यांच्यासमोर ठेवला. त्यानंतर आम्ही 7074870748 हा नंबर जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, SmS करून, व्हॉट्सअप मॅसेज करून मनपसंद मुख्यमंत्र्याचा चेहरा जनतेनं सांगावा, असे आवाहन भगवंतमान यांनीही केले आहे.

सर्वेनुसार आपला चाळीस टक्के तर काँग्रेसला 36 टक्के मतं मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आम आदमी पार्टीला 52-58 इतक्या जागा मिळतील, तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपला एक ते तीन जागी विजय मिळू शकतो, अशी शक्यता आहे. तर अकाली दल 17 ते 23 जागी बाजी मारेल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पंजाब या सर्वेनुसार पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे.