छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला तालुक्यातील नवनियुक्त सरपंचांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

येवला :- येवला तालुक्यातील चार गावांतील नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (NCP) प्रवेश केला. यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित सरपंच व सदस्यांचे स्वागत करत सन्मान केला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. आज येवला तालुक्यातील कोटमगाव बु.चे सरपंच राजेंद्र काकळीज व सदस्य, आडगाव चोथवाचे सरपंच रामनाथ खोकले व सदस्य, कुसुरच्या सरपंच सुरेखा गायकवाड व सदस्य यांच्यासह एरंडगाव खु. च्या सरपंच योगिता खापरे व सदस्यांनी येवला संपर्क कार्यालय छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी छगन भुजबळ यांनी या सर्व सरपंच व सदस्यांचे स्वागत करत सन्मान केला. तसेच गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट ठेऊन काम करावे अशा सूचना त्यांनी केल्या.