अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ; पुण्यातील मालमत्ता रिकामी करण्यासाठी ED ची नोटीस

मुंबई – अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना ईडीची नोटीस (Notice of ED) मिळाली आहे. जप्त केलेली मालमत्ता रिकामी करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आलेत. पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयच्या (CBI)  अटकेनंतर, ईडीने भोसले यांना पुण्यातील त्यांची मालमत्ता रिकामी करण्यासाठी नवीन नोटीस बजावली आहे. सदर प्रॉपर्टी गेल्यावर्षी मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणात ईडीने जप्त केली होती.

अविनाश भोसले यांना डीएचएफएल-येस बँक (DHFL-Yes Bank) फसवणूक प्रकरणात सीबीआयने अटक केली आहे. भोसले यांना सीबीआयने पुढील तपासासाठी दिल्लीला नेले आहे. अविनाश भोसले यांना मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे.ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती आणि मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता.

अविनाश भोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये विविध कंपन्यांचे शेअर, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. अविनाश भोसले आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात असणारी 1.15 कोटी रुपयांची रक्कम देखील ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये  हॉटेल वेस्टिन- पुणे (Hotel Westin-Pune), हॉटेल ली मेरिडियन- नागपूर, हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा  याचा समावेश आहे.