आरोग्य विभागाचा चार्ज स्वीकारताच तुकाराम मुंढे यांचा धडाका, सरप्राइज भेटींना सुरुवात

पुणे- शिंदे–फडणवीस सरकारने (Shinde – Fadanavis Goverment) केलेल्या 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची बदली करण्यात आली आहे. आरोग्‍य सेवेच्या आयुक्तपदी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त आरोग्‍य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा पदभार स्वीकारताच मुंढे यांनी कामाचा धडाका लावला आहे.

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्राला सुरुवात झाली आहे. पुण्यातील आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकण्यात आली आहे. रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर डॉक्टर उपस्थित नसल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली होती. मात्र या ठिकाणी डॉक्टर उपस्थित असल्याचे निदर्शनात आल्यानंतर कारवाई टळली आहे.

मुंढे यांची एवढी धास्ती अधिकाऱ्यांनी घेतली की, व्हिजिट केलेल्याचे ठिकाण, वेळ कळावे यासाठी त्याचे गुगल लोकेशन टाकून त्यांनी छायाचित्रे काढली. मात्र अधिकारी व्हिजिटला येणार आहेत हे आधीच “लीक’ झाल्याने या व्हिजिटने “स्टाफ’ला “सरप्राइज’ मिळाले असे म्हणता येणार नाही. मात्र, अशी व्हिजिट खरेच झाली तर निलंबनाची कारवाई मोठ्या प्रमाणात होणार हे नक्की, असे बोलले जात आहे.