भारताच्या कसोटी विजयाच्या आनंदाला विर्जन! अष्टपैलूला आयसीसीकडून दंड, पण कारण काय?

Nagpur- भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेला पहिला कसोटी सामना १ डाव आणि १३२ धावांच्या फरकाने जिंकला. या विजयासह यजमानांनी ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. परंतु या शानदार विजयानंतरही भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला आयसीसीने (ICC) शिक्षा ठोठावली आहे. पण त्यामागचे कारण काय?

तर जडेजाला नागपूर येथे पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. जडेजाने खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्‍यांसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२०चे उल्लंघन केल्याचे आढळून आले, जे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आहे. या व्यतिरिक्त, जडेजाच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. २४ महिन्यांच्या कालावधीतील हा त्याचा पहिला गुन्हा होता.

रविंद्र जडेजाने नेमकी काय चूक केली?
गुरुवारी, ९ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या ४६व्या षटकात ही घटना घडली, जेव्हा जडेजा त्याच्या तर्जनीला वेदना कमी होणारी क्रीम लावताना दिसला. मात्र यावेळी त्याच्या हातात चेंडू असल्याने ऑस्ट्रेलियन मीडियाने जडेजाच्या कृतीवर प्रश्न उपस्थित केले होते. व्हिडिओ फुटेजमध्ये, फिरकीपटू जडेजाने मोहम्मद सिराजच्या तळहातातून एक पदार्थ घेतला आणि तो त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला चोळताना दिसला.

भारताच्या संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले होते की जडेजा केवळ त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या तर्जनीवर क्रीम लावत होता. मात्र मैदानावरील पंचांची परवानगी न घेता त्याने हे केले गेले. त्यामुळे त्याला आयसीसीकडून शिक्षा देण्यात आली आहे.

जडेजाने त्याचा गुन्हा कबूल केला आणि मॅच रेफरींच्या एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेलच्या अँडी पायक्रॉफ्टने प्रस्तावित केलेली मंजुरी स्वीकारली. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.