INDvsAUS 1st Test: अश्विनपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या, भारताचा कांगारूंवर १ डाव आणि १३२ धावांनी मोठा विजय

IND vs AUS: फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही विभागात आपल्या शानदार प्रदर्शनाची झलक दाखवत भारतीय संघाने पाहुण्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीत पराभूत केले आहे. नागपूरच्या मैदानावर झालेल्या या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ १७७ धावांवर गारद झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४०० धावा करत २२३ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि भारताने एक डाव व १३२ धावांच्या फरकाने सामना जिंकला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

ऑस्ट्रेलियाच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने झुंजार खेळी केली. एका बाजूने विकेट्स जात असताना त्याने बचावात्मक खेळ खेळला. २ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १२० धावांची खेळी करत त्याने संघाला संकटातून बाहेर काढले. रोहितनंतर चांगली धावसंख्या उभा करण्याचे शिवधनुष्य रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी पेलले.

जडेजाने १८५ चेंडूत ७० धावा केल्या. या खेळीसाठी त्याने ९ चौकार मारले. तर अक्षर पटेलनेही १७४ चेंडूत १ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ८४ धावा फटकावल्या. शेवटी मोहम्मद शमीनेही ४७ चेंडूत ३७ धावा करत धावफलक हालता ठेवण्यात हातभार लावला. अखेर १३९.३ षटकात भारतीय संघ ४०० धावा करत सर्वबाद झाला. परिणामी भारताकडे २२३ धावांची आघाडी आली.

मात्र भारताच्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा संघ फोल ठरला. मार्नस लाब्यूशेनने ४९ धावांची उपयुक्त खेळी केली. त्याला वगळता इतर फलंदाज अपेक्षित धावा करू शकले नाही. सलामीवीर उस्मान ख्वाजा (०५ धाव) आणि डेविड वॉर्नर (१० धाव) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर स्टिव्ह स्मिथकडून अपेक्षा असताना तोही २५ धावांवर नाबाद राहिला. इतर फलंदाज २० चा आकडाही गाठू शकले नाहीत. परिणामी ३३ षटकातच ऑस्ट्रेलियाचा संघ ९१ धावांवर गुंडाळला गेला.

या डावात भारताकडून फिरकीपटू आर अश्विनने प्रशंसनीय कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ५ फलंदाजांना बाद केले. मोहम्मद शमी, रविंद्र जडेजाने प्रत्येकी २ आणि अक्षर पटेलने १ विकेट घेत संघाच्या विजयात हातभार लावला.