भारतीय क्रिकेटर्सनी घेतले बाबा महाकालचे दर्शन, दुखापतग्रस्त ऋषभ पंतसाठी विशेष प्रार्थना

उज्जैन| भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना आता २४ जानेवारीला इंदोरच्या मैदानावर रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडूंनी उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) प्रकृतीसाठीही प्रार्थना केली.

इंदोरच्या होळकर स्टेडियमवर शेवटचा वनडे सामना खेळला जाणार आहे. या मॅचआधी भारतीय संघ उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात पोहोचला. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), स्पिन बॉलर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी सोमवारी सकाळी महाकालेश्वरचे दर्शन घेतले. हे सर्व खेळाडू आणि कोचिंग स्टाफ बाबा महाकाल (Mahakal Temple) यांच्या भस्म आरतीमध्ये सहभागी झाले होते. सर्व खेळाडूंनी विधीवत बाबा महाकाल यांची पूजा करुन आशिर्वाद घेतले. सर्व खेळाडू भगवान शंकराच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन ओम नमः शिवाय हा जप करताना दिसले.

दर्शन घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवने मीडियाशी चर्चा केली. “बाबा महाकाल यांच्या दिव्य अलौकिक भस्म आरतीमध्ये सहभागी होऊन धन्य झालोय” असे सूर्यकुमारने सांगितले. बाबा महाकालकडे मित्र ऋषभ पंतसाठी विशेष प्रार्थना केल्याच सूर्याने सांगितलं. “मी भरपूर साऱ्या गोष्टी मागितल्या आहेत. माझा प्रिय मित्र आणि क्रिकेटर ऋषभ पंतच्या प्रकृती स्वास्थासाठी मी विशेष प्रार्थना केली” असं सूर्या म्हणाला.