नितेश राणेंचा वादग्रस्त बॅनर लावणाऱ्यांना राणेंनी झापलं; म्हणाले…

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यावरून आता पोस्टरबाजी सुरू झाली आहे.

दरम्यान, नितेश राणेंचे पोस्टर मुंबईत लावण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे राणे प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नॉट रिचेबल असलेल्या नितेश राणे यांच्याबाबत मुंबईत चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात लावलेले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांचे चर्चगेट स्टेशनबाहेर बॅनर लावण्यात आले आहे.

बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून ते हरवले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असेही लिहिण्यात आले आहे. नितेश राणे पोलिसांसमोर येत नसल्याने मुंबईत पोस्टबाजी करण्यात आली आहे. मात्र, हे बॅनर कोणी लावले आहे, याबाबत त्यावर काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे बॅनर कोणी लावले, याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

या बॅनरबाजीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिलंय. ते लोकं हे पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत, राज्याचा कारभार करण्याच्या लायकीचे नाहीत. आता एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन लावत फिरा, असा टोला राणेंनी विरोधकांना लगावलाय.