युक्रेनमधून भारताने आपले नागरिक तर मायदेशी परत आणलेच सोबत 18 देशातील नागरिकांचे प्राण वाचवले

नवी दिल्ली – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन गंगा मध्ये सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला. ऑपरेशन गंगाअंतर्गत आत्तापर्यंत 23 हजार भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलं असून 18 देशांमधील 147 परदेशी नागरिकांनाही परत आणलं आहे.

कालच्या चर्चेमध्ये यामध्ये सहभागी असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसह युक्रेनमधून सुटका झालेल्या पोलंड, स्लोव्हाकिया, रुमानिया आणि हंगेरी या देशातील प्रतिनिधींनीही पंतप्रधानांशी संवाद साधला आणि अनुभव कथन केलं. त्यांना सामोरे जावे लागलेल्या आव्हानांप्रमाणेच इतक्या कठीण परिस्थितीत भारतानं केवळ मानवतेच्या उदात्त दृष्टिकोनातून राबविलेल्या या मोहिमेबद्दल त्यांनी आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. ही मोहीम कार्यान्वित करताना त्यात सहभागी झालेल्या नेते, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आदींचे मोदी यांनी आभार मानले.

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात युक्रेमधल्या स्थितीसंदर्भात निवेदन दिलं. ऑपरेशन गंगा या मोहीमेअंतर्गत भारतानं नेपाळ आणि बांग्लादेशातल्या काही नागरिकांचा तसंच भारतीय नागरिकांच्या कुटुंबाचे सदस्य असलेल्या मूळ युक्रेनच्या नागरिकांनाही परत आणल्याचं त्यांनी सांगितलं. या मोहीमेअंतर्गत प्रवासी आणि नौदलाच्या विमानांनी 90 उड्डाणं केली, अशी माहिती त्यांनी दिली. ही मोहीम अत्यंत विपरीत परिस्थितीत राबवली गेली. मायदेशी आणलेल्या नागरिकांपैकी बहुतांश विद्यार्थी आणि नागरिक प्रत्यक्ष युद्धग्रस्त भागात अडकलेले होते. त्यामुळे विशेष धोरण आखून, युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांच्या मदतीनं ही त्यांना मायदेशी आणलं, असं त्यांनी सांगितलं.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी युक्रेनमधल्या भारतीय दुतावासातल्या अधिकाऱ्यांनी कठीण परिस्थितीही आपल्या क्षमतेपलीकडे काम केलं असं ते म्हणाले. युक्रेनमध्ये मारल्या गेलेल्या नवीन जी. या भारतीय विद्यार्थ्याचं पार्थीव लवकरच भारतात परत आणलं जाईल, त्यासाठी तिथलं भारतीय दूतावास प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले.