महागाईविरोधात काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन, मुंबईत कॉंग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : महागाई, जीएसटी आणि तपास यंत्रणाच्या गैरवापराच्या मुद्यावरुन काँग्रेस आज शुक्रवारी देशभरात निदर्शने करणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यासाठी मोर्चाबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्यांना विधानभवन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे , वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विधानभवनातून बाहेर पडू न दिल्यामुळे आता काँग्रेसकडून विधानभवन गेटवर आंदोलनाला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते संजय निरुपम आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात असून जुहूमधून ताब्यात घेत वर्सोवा पोलीस स्टेशनला नेलं आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच मोठे नेते रस्त्यावर उतरणार आहेत. यासाठी पक्षाने द्विस्तरीय रणनीती तयार केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. यामुळे मुख्यालयाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.