बांगलादेशवर मात करत भारताचा WTC Final चा मार्ग सोपा, पण ‘या’ संघापासून धोका; पाहा गणिते

ढाका| श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि आर अश्विन (R Ashwin) यांच्या समंजस फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशच्या जबड्यातून विजय हिसकावून (IND vs BAN) घेतला. मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमानांचा 3 विकेट्सने पराभव केला. यासह भारतीय संघाने 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (World Test Championship) आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. भारतीय संघ सध्या दुस-या क्रमांकावर कायम आहे आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या जवळ आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम स्थानावर विराजमान असल्याने त्यांचे अंतिम फेरी गाठणे निश्चित असल्याचे मानले जात आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी जूनमध्ये ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारत 55.77 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे 54.55 टक्के गुण होते. ढाका येथे दुसऱ्या कसोटीत जर भारतीय संघ हारला असता तर दक्षिण आफ्रिकेला मदत मिळाली असती. मात्र या विजयाचा फायदा भारताला झाला. भारतीय संघ 58.93 टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. याचा अर्थ मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेवर दबाव असेल.

अंतिम फेरीसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बरोबरीची टक्कर होऊ शकते. शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना त्यांचे उर्वरित किमान तीन सामने जिंकणे आवश्यक आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ अंतिम फेरीत (WTC Final) कसे पोहोचतील?

  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 4-0 असा विजय मिळवला तर ते सहज अंतिम फेरीत पोहोचतील. या स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. उर्वरित चार सामने जिंकूनही ते अंतिम फेरीत जाऊ शकणार नाहीत.
  • परंतु जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 3-0 ने पराभूत केले तर रस्ता थोडा कठीण होईल. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ चारही सामने जिंकून विजेतेपदाच्या नजीक पोहोचेल.
  • भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 3-1 असा पराभव केला तर दक्षिण आफ्रिकेच्या आशा कायम राहतील. ते चार सामने जिंकत अंतिम फेरीत पोहोचू शकतील.