प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर टेकवले मस्तक; अजित पवार म्हणाले, “संविधानाने त्यांना…”

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर येथे औरंगजेबाचे पोस्टर दाखविल्याने उडालेला गोंधळ, राज्यात या कारणामुळे होणाऱ्या दंगली या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शनिवारी भेट दिली. या भेटीमुळे सर्वच स्तरातून अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातले आहेत. तसेच ते माजी खासदार व वंचित आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून काय करावं? हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. लोकशाहीत संविधानाने हा अधिकार दिला आहे. पण असं कुणी केलं तर ते शिवप्रेमींना आवडत नाही. शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तेव्हा औरंगजेबाने महाराजांना त्रास दिला होता. इतिहासात ज्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांना ती कृती योग्य वाटत नाही,” असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.