आता मात्र हद्द झाली; भाजपा नेते रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. कोश्यारींना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी महाविकास आघाडी आणि अन्य नेत्यांकडून केली जात आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना भाजपाचे केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे. आता यावरून राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रावसाहेब दानवे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत दानवे राज्यात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशाप्रकारचे वक्तव्य कोणी करू नये. तसेच शिवाजी महाराजांचा अवमान करण्यासाठी हे वक्तव्य केलेले आहे का?, याचीही तपासणी करण्यात यावी. असे रावसाहेब दानवे व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. परंतु असे बोलताना त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे, ज्यामुळे ते टीकेचे धनी ठरले आहेत. आता यावर महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे नेते काय भूमिका घेतात?, हे पाहावे लागेल.