महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीमध्ये शाई फेक

पुणे :   भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली आहे. पाटील यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही शाईफेक करण्यात आली आहे. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांकडून हे कृत्य केलं गेल्याचं सांगितलं जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. पण त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आलीय.

चंद्रकांत पाटील आज पिंपरीत मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्याला हजेरी लावणार होते. या दरम्यान एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता एका व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली.विशेष म्हणजे अशाप्रकारची घटना घडू शकते, अशी शंका पोलिसांना आधीच होती. त्यामुळे संबंधित कार्यकर्त्याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण तरीही ही अनपेक्षित घटना घडलीय.