कैद्यांना५० हजारांचे कर्ज ही अभिनव योजना; हेमंत टकले यांनी मानले गृहमंत्र्यांचे आभार…

मुंबई – न्यायालयीन प्रक्रिया लांबल्यामुळे कित्येक वर्ष तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्यांना त्यांच्या वैद्यकीय, कायदेशीर किंवा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून ५० हजारांचे कर्ज देण्याची अभिनव योजना (Loan for prisoners) देशात पहिल्यांदाच अंमलात येत असून ही योजना आणणारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Home Minister Dilip Walase Patil) यांचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष हेमंत टकले (Hemant Takale) यांनी आभार मानले आहेत.

राज्यातील तुरुंगात अनेक काळापासून शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण योजना आणली आहे त्यावर माजी आमदार हेमंत टकले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

राज्यातील तुरुंगात असलेल्या कैद्यांपैकी अनेकजण हे त्यांच्या घरातील प्रमुख असतात. त्यांच्या अनुपस्थितीत कुटुंबाची अवस्था दयनीय होते. याकाळात महत्त्वाच्या कामांसाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न उभा राहतो. अशा उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांसाठी राज्याच्या गृहविभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे असेही हेमंत टकले म्हणाले.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज ७ टक्के इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्याची योजना येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे हा अतिशय परिणामकारक दूरगामी असा निर्णय आहे असेही हेमंत टकले यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून चांगल्या गोष्टी घडत आहेत. मात्र नकारात्मक बातम्यांच्या गदारोळात चांगल्या बातम्या झाकोळल्या जातात अशी खंत व्यक्त करतानाच अशा चांगल्या निर्णयामुळे फुले-शाहू-आंबडेकरांच्या पुरोगामी विचारांवर चालणारे महाविकास आघाडीचे सरकार आहे हे दिसून येते असेही हेमंत टकले यांनी स्पष्ट केले.