‘माझ्या ताफ्याला कुणीतरी अडवणार हे इंटेलिजन्सला समजलं मात्र  पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत, हे नाही कळलं’

ठाणे –  महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज ठाकरे नावाचं वादळ आता घोंगावू लागले असून विरोधक देखील  घायाळ चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची  ठाण्यात सभा झाली असून मागच्या सभेपेक्षा ही सभा जोरदार झाली.  गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आज झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली.

राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामधून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं. आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर त्यांनी तोंडसुख घेतलं. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, व्यासपीठावर येताना मला अग्निशम दलाचा बंब दिसला. पण मी इतकी काही आगा लावणार नाहीये. आज दुपारी मी बसलो असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं किती वाजता निघणार आहात? म्हटलं का? तर म्हणे काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आम्ही त्यांना ताब्यात वगैरे घेऊ. मी म्हटलं निघेन तेव्हा कळवतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ताफ्याला कुणीतरी अडवणार आहे, हे इंटेलिजन्सला कळलं, पण पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत, हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरंतर त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते असं त्यांनी म्हटले आहे.

गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपा-शिवसेनेकडे बहुमत आल्यानंतरही तुम्ही मतदारांशी प्रतारणा केली. त्याआधी पाहाटेचा शपथविधी झाला. तो फिसकटला. मग यांचं सरकार बनलं. या दोन्ही गोष्टींवर मी बोलल्यावर भाजपाची स्क्रिप्ट कुठून आली? ते विसरले होते, मी फक्त आठवण करून दिली. असं ठाकरे म्हणाले.