भाजपला ऐक्य नको, हे शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं : संजय राऊत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विविध विषयांवर दिलेल्या 61 भाषणांवर आधारीत पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं आहे. ‘नेमकचि बोलणे’ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राऊत यांनी केलेल्या भाषणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राऊत म्हणाले, जे विकृत राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यावर सुद्धा पवारांनी 25 वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहेत. भाजपला ऐक्य नकोच आहे. ते त्यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं. आम्हाला ते दोन वर्षांपूर्वी समजलं.

राऊत म्हणाले, भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. हे पवारांनी 1996मध्ये सांगितलं होतं. ते आता आम्हाला कळू लागलं आहे. हे पुस्तक आपण मोदींना पाठवायला हवं अशी अपेक्षा देखील राऊत यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र हा देशाला विचार देत असतो. ‘नेमकची बोलणे’ हे पुस्तक पंतप्रधान मोदींना पाठवायला हवं, असं त्यांनी सांगितलं. या ग्रंथाला भगवा कलर घातला. मी आपला आभारी आहे. अवघा रंग एकची झाला. देशाचा महाराष्ट्राचा रंग भगवा आहे, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.