काव्या मारनच्या सनरायझर्सला मिळाला नवा सलामीवीर, मयंक अगरवाल इतक्या कोटींसह संघात

IPL Auction Live: इंडियन प्रीमियर लीग २०२३चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) आज (२३ डिसेंबर) केरळच्या कोची येथे सुरू आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता या लिलावाची सुरुवात झाली.

भारताचा अनुभवी खेळाडू मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याला लिलावात विकत घेण्यासाठी त्याची जुनी फ्रँचायझी पंजाब किंग्ज, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. मयंक १ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याच्यावर सर्वप्रथम प्रिती झिंटाच्या मालकीच्या पंजाब या संघाने बोली लावली. पुढे चेन्नई व हैदराबाद या संघांनीही त्याला विकत घेण्यासाठी पुढाकार घेतला. अशाप्रकारे तिन्ही संघांमध्ये रस्सीखेच झाल्यानंतर अखेर ८.२५ कोटींसह हैदराबाद या संघाने त्याला विकत घेतले आहे. मयंक हैदराबाद संघात सलामीवीराची जागा भरून काढू शकतो.

दरम्यान गतवर्षीची विजेती फ्रँचायझी गुजरात टायटन्सपासून (Gujrat Titans) आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सपर्यंत (Mumbai Indians) सर्व १० फ्रँचायझींचे संघमालक ऑक्शन टेबलवर बसून संघ मजबूत बनवताना दिसत आहेत. लिलावात एकूण ४०५ खेळाडू सहभागी झाले असून त्यांपैकी २७३ भारतीय, १३२ परदेशी आणि ४ खेळाडू असोसिएट देशांचे आहेत. आयपीएल फ्रँचायझी या ४०५ पैकी केवळ ८७ खेळाडूंना विकत घेतील. काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या पर्समध्ये सर्वाधिक ४२.२५ कोटी रुपये आहेत. तर शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ सर्वात कमी ७.०५ कोटींसह लिलावात उतरला आहे.