IPL Auction Live: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर ‘या’ संघाने दाखवला रस, मूळ किंमतीत घेतले विकत

IPL Auction Live: इंडियन प्रीमियर लीग २०२३चा मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) आज (२३ डिसेंबर) केरळच्या कोची येथे सुरू आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता या लिलावाची सुरुवात झाली.

भारताचा ३४ वर्षीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने लिलावात विकत घेतले. रहाणे हा उजव्या हाताचा फलंदाज असून तो ५० लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याच्यावर चेन्नईला वगळता इतर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. परिणामी ५० लाखांच्या मूळ किंमतीसह तो चेन्नई संघात सहभागी झाला.(IPL Auction Live: CSK bag Ajinkya Rahane).

दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही जो रूट (Joe Root) पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला. मात्र बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्यावरही कोणत्या संघाने रस न दाखवत सर्वांना आश्चर्यचकित केले.

दरम्यान गतवर्षीची विजेती फ्रँचायझी गुजरात टायटन्सपासून (Gujrat Titans) आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सपर्यंत (Mumbai Indians) सर्व १० फ्रँचायझींचे संघमालक ऑक्शन टेबलवर बसून संघ मजबूत बनवताना दिसत आहेत. लिलावात एकूण ४०५ खेळाडू सहभागी झाले असून त्यांपैकी २७३ भारतीय, १३२ परदेशी आणि ४ खेळाडू असोसिएट देशांचे आहेत. आयपीएल फ्रँचायझी या ४०५ पैकी केवळ ८७ खेळाडूंना विकत घेतील. काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या पर्समध्ये सर्वाधिक ४२.२५ कोटी रुपये आहेत. तर शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ सर्वात कमी ७.०५ कोटींसह लिलावात उतरला आहे.