“काही लोक स्वत:ला कायद्यापेक्षाही वरचे समजू लागलेत”, माजी अंपायरची धोनीला सणसणीत चपराक

चार वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हा क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी आणि हुशार कर्णधारांमध्ये गणला जातो. मंगळवारी आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान कर्णधार धोनीने क्रिकेट जगताला दोन भाग पाडून टाकले. एकीकडे चाहते त्याच्या कॅप्टन्सीचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे अनेक माजी क्रिकेटपटू धोनीच्या या कृतीवर टीका करत आहेत. धोनीच्या टीकाकारांमध्ये माजी पंचांनीही उडी घेतली आहे.

हे प्रकरण आयपीएल 2023 क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई आणि गुजरात (CSK vs GT) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचे आहे. सामन्याच्या 16 व्या षटकाच्या आधी, मैदानावरील पंच अनिल चौधरी यांनी मथिशा पाथिरानाला गोलंदाजी करण्यापासून रोखले, कारण तो चार मिनिटे मैदानाबाहेर होता. त्यानंतर धोनीने सुमारे चार मिनिटे खेळ थांबवला, जेणेकरुन पथिराना 16 वे षटक टाकेल.

यावरुन आयसीसीचे माजी पंच डॅरिल हार्पर (Umpire Daryl Harper) यांनी धोनीवर टीका केली आहे. ते म्हणाला की “त्यावेळी धोनीने त्याच्या आवडत्या गोलंदाजाची षटके घेण्यात नक्कीच वेळ वाया घालवला. असे करून धोनीने खेळाच्या भावनेचा भंग केला आहे. काही लोक स्वत:ला कायद्यापेक्षाही वरचे समजू लागले आहेत असे दिसते”, असेही हार्पर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, काही लोक जिंकण्यासाठी कुठली हद्द पार करतील काही सांगता येत नाही, धोनीची ही कृती पाहून मला धक्का बसला. आजकाल धोनी मैदानावर पूर्वीसारखा शांत दिसत नाही आणि तो आपला राग खेळाडूंवर काढत असतो. खेळाचा अनादर करणाऱ्या अशा खेळाडूंना वेळीच समज द्यायला हवी. क्रिकेटपेक्षा कोणीही मोठे नाही मग तो धोनी जरी असला तरी नाही.”