शिवसेनेत अजूनही धुसफूस सुरूच? उपराष्ट्रपती निवडणुकीत पाच खासदारांनी मतदान टाळले

Mumbai – एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड  हे उपराष्ट्रपती  पदाच्या निवडणुकीत (Vice President election 2022) विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. नवे उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी पदाची शपथ घेतील.  धनकड यांना 528  टक्के मतं तर मार्गारेट अल्वा  यांना  182  मतं मिळाली आहेत.

दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सहा खासदारांनी मतदान केले नाही. त्यात लोकसभेतील पाच तर राज्यसभेतील एक खासदार यांचा समावेश आहे. राज्यसभेतील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे ईडीच्या कोठडीत असल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मात्र उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या लोकसभेतील इतर पाच खासदारांनी मतदान टाळल्याने तो पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलेल्या खासदारांपैकी फक्त ओमराजे निंबाळकर यांनीच मतदान केले.

शिवसेनेने काॅंग्रेसच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बारा खासदारांनी भाजपचे उमेदवार जगदिप धनकड यांना पाठिंबा दिला होता. शिंदे गटाच्या सर्व बारा आमदारांनी मतदान केले. शिवसेनेचे प्रतोद राजन विचारे, विनायक राऊत, अरविंद सावंत गजानन किर्तीकर आणि संजय जाधव यांनी मतदान टाळले. त्यातील राऊत आणि जाधव यांनी आजारी असल्याचे कारण दिल्याचे समजते. किर्तीकर आधीपासूनच आजारी आहेत. इतर दोघांचे मतदान न करण्याचे कारण समजू शकले नाही. यामुळे शिवसेनेत अजूनही धुसफूस सुरु आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.

जगदीप धनखर यांची 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी १७ जुलै रोजी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. भारताचे उपराष्ट्रपती, देशातील दुसरे सर्वोच्च संवैधानिक पद, राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजद्वारे निवडले जाते. देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात.