आशिया चषकापूर्वी टीम इंडियासाठी आली आनंदाची बातमी, ‘या’ मालिकेतून कमबॅक करतोय बुमराह!

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून खेळापासून दूर होता. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळला होता. त्यानंतर जस्सी पाठीच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. तो टी20 विश्वचषक, आशिया चषक, आयपीएल 2023 आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामनाही खेळू शकला नाही. मात्र, आता त्याच्या चाहत्यांसाठी आणि भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बुमराह लवकरच मैदानात पुन्हा दिसू शकतो.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह ऑगस्टमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत पुनरागमन करू शकतो. आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी भारतासाठी हे चांगले संकेत आहेत. आयर्लंड मालिकेनंतरच 31 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे.