सनी देओलचा मुलगा करण आणि द्रिशा आचार्य यांचे ‘शुभमंगल सावधान’, लग्नातील फोटो होतायत व्हायरल

मुंबई- जेष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि अभिनेता सनी देओल यांचा मुलगा करण देओल याचा प्रेयसी द्रिशा आचार्य सोबत आज मुंबईतील ‘ताज लँड्स एंड’मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह झाला.

वरराजा करण देओलने क्रीम रंगाच्या शेरवानीसोबत मॅचिंग शेहरा घातला होता. वधू द्रिशा आचार्य लाल रंगाच्या लेहेंग्यात सुंदर दिसत होती. या दोघांचे लग्नातील तसेच सात फेऱ्यांपूर्वी मिरवणुकीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. करणचे आजोबा धर्मेंद्र, आजी प्रकाश कौर, वडील सनी देओल आणि काका बॉबी देओल आणि अभय देओल बारातीत दिसले.

करण देओल आणि द्रिशा आचार्य बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. द्रिशा एक प्रसिद्ध डिझायनर आहे. करणने वडील आणि आजोबांच्या मार्गावर चालत अभिनयाला आपला व्यवसाय बनवला. करणने 2019 मध्ये त्याचे वडील सनी देओल दिग्दर्शित ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. करणने ‘वेले’मध्ये काम केले आहे, आता तो ‘अपने 2’ चित्रपटात दिसणार आहे. द्रिशा आचार्यचेही चित्रपट कनेक्शन आहे. ती प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांची नात आहे.