निसर्गरम्य वातावरणात गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या “श्री दशाश्वमेधेश्वर मंदिरा”चा शासनाने विकास करावा

परभणी/धसाडी/विनायक आंधळे : आज आपण एका अशा धार्मिक स्थळाविषयी माहिती घेणार आहोत जे निसर्गरम्य वातावरण व दक्षिणगंगा संबोधली जाणारी गोदावरी (Godavari) च्या तीरावर पूर्वाभिमुख असलेले मंदिर म्हणजेच श्री दशाश्वमेधेश्वर मंदिर. हे मंदिर गंगाखेड (Gangakhed) – परभणी रोडवर सुनेगाव पाटी पासून पूर्वेकडे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर धसाडी (Dhasadi) या गावी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की, गोदावरी नदी काठावर असून श्री दशाश्वमेधेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी काही पायऱ्या चढून जावे लागते. आत गेल्यानंतर अतिशय प्रशस्त असा गाभारा व सभामंडप आहे. त्यामध्ये शिवलिंग पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते. काशीच्या नदी किनार्यावर सुद्धा १०० हून अधिक घाट पाहायला मिळतात. परंतु, येथील दशाश्वमेधेश्वर घाट सर्वात प्राचीन आणि सुंदर आपल्याला पाहायला मिळतो.

मंदिराच्या समोर उंच ओट्यावर छानसा सुंदर व मोठा नंदी दिसतो. नंदीच्या पाठीमागे गंगेच्या पात्रात जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे . या ठिकाणी आल्यानंतर कितीही निराश असलेला माणूस महादेवाच्या दर्शनानंतर व परिसराचे विहंगम दृश्य पाहून प्रफुल्लित झाल्याशिवाय राहत नाही. छायाचित्रणासाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. या मंदिराची रचना व शिवलिंगाची रचना पाहता ही खूप प्राचीन असल्याची जाणकारांचे मत आहे.

  • प्रभू रामचंद्रांनी शिवलिंगाची स्थापना केल्याच या ग्रंथात आढळते

काही मान्यता अशी आहे की प्रभू रामचंद्र (Lord Ramachandra) वनवासात असताना गोदावरी नदीच्या तीरावर त्यांनी या शिवलिंगाची स्थापना करून पूजन केले होते. प्रभू राम, सीता, लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी. आज जीर्णोद्धार व विकास मागत आहे. काशीखंड ग्रंथ व गोदावरी महात्म्य या ग्रंथात प्रभू रामचंद्राने या पावनभूमीवर येऊन दहा यज्ञ केले आहेत असा उल्लेख आढळण्याचे या संस्थांनचे वयोवृद्ध सदस्य श्री सखाराम शिंदे यांनी सांगितले.

  • अनेक संतांनी या स्थळास भेटी दिल्या

भाविकांचा दृढविश्वास आहे की, या मंदिरात मनोभावे पूजा अर्चना केली असता आपल्या मनोकामना पूर्ण होतात. अनेक संतांनी या पवित्र स्थळास भेट देऊन याचे महत्त्व सांगितले आहे. संतश्रेष्ठ नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, विनायक महाराज साखरे, भागवत महाराज देहूकर, रंगनाथ महाराज परभणीकर, सद्गुरु मोतीराम महाराज, ह.भ.प. वैराग्यमुर्ती मारोती महाराज दस्तापूरकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कीर्तनाच्या माध्यमातून श्री दशाश्वमेधेश्वर महादेवाचे वर्णन आणि संकीर्तन केले आहे. हे भक्ताच्या नवसाला पावणारे दैवत आहे. परभणी जिल्ह्यातून व सबंध महाराष्ट्रातून (Maharashtra) दर सोमवारी व महाशिवरात्रीला या ठिकाणी भक्तगणांची मोठ्या प्रमाणात भगवान श्री दशाश्वमेधेश्वर मंदिर दर्शन घेण्यासाठी गर्दी होते.

  • विकासाच्या प्रतीक्षेत श्री दशाश्वमेधेश्वर मंदिर

धसाडी हे गाव परभणी (Parbhani) तालुक्यात असून ऐतिहासिक वारसा लाभलेले हे मंदिर एक वेळ जर भेट दिली तर वारंवार दर्शनास यावे असे वाटते. असे हे पावन पवित्र ठिकाण आज विकासाच्या प्रतीक्षेत आहे. धसाडी येथील गावकऱ्यांनी व परिसरातील भक्तांनी एक मंदिर समिती स्थापन केली आहे. 2018-19 या वर्षात तिला मंजुरी मिळालेली आहे. या समितीने शासनाकडे भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी व पर्यटनास (Tourism) चालना मिळावी यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु शासनाने अद्याप याकडे लक्ष दिले नसल्याचे जाणवते.

  • श्री दशाश्वमेधेश्वर मंदिर येथे भाविकांची होत आहे गैरसोय

या ठिकाणी व्यवस्थितपणा व भाविकांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या. भक्तांना राहण्यासाठी व पूजा अर्चनासाठी सोयी सुविधा उपलब्ध झाल्या तर परभणी जिल्ह्यात अतिशय उत्कृष्ट असे पर्यटन स्थळ संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांसाठी उपलब्ध होईल. अशी अशा गावकऱ्यांना व परिसरातील भक्तांना आहे.

शासनाने या मंदिर समितीच्या मागण्या मान्य कराव्यात,तसेच “ब” दर्जा द्यावा व तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणचा विकास करावा. अशी संपूर्ण भाविकांची मागणी आहे.

  • पर्यटनाच्या आणि रोजगाराच्या संधी

काही पर्यटकांच्या म्हणण्यानुसार नदी किनारा लाभल्यामुळे या ठिकाणी बोटिंग, वॉटर पार्क, गार्डन व इतर व्यवस्था केली तर भाविकांना व पर्यटकांना पर्यटनाची (Tourism) सोय होईल व स्थानिकांना रोजगाराच्या अनंत संधी उपलब्ध होतील. शासनाने याकडे लक्ष देऊन मंदिर परिसराचा विकास करावा अशी मागणी गावकऱ्यांतर्फे व मंदिर समितीतर्फे करण्यात येत आहे.