सज्जन माणसे आल्याशिवाय राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही- माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

Sadabhau Khot : समाजामध्ये विविध क्षेत्रांत अनेक चांगली माणसे आहेत. परंतु राजकारणाचा चिखल आपल्या अंगावर ओढवून कशाला घ्यायचा, यासाठी ते राजकारणापासून दूर राहतात. अशा माणसांमुळेच राजकारणामध्ये वाईट माणसांचे प्रमाण वाढत आहे. राजकारणाची गटारगंगा झाली आहे, अशी केवळ टीका करण्यापेक्षा ती स्वच्छ करण्यासाठी सज्जन माणसांनी राजकारणामध्ये उतरले पाहिजे. तरच राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होऊन देशाची लोकशाही बळकट होईल, असा विश्वास माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे न-हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ७ युवा संसदेचा समारोप झाला. यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते.

नगरसेवक गणेश बिडकर आणि दत्तात्रय धनकवडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार तर खासदार अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार यावेळी देण्यात आला तसेच भरीव सामाजिक कार्यासाठी माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, आजच्या तरुणांना या युवा संसदेच्या माध्यमातून नवीन विचार दिला पाहिजे. हा विचार घेऊनच ते तरुण समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतील आणि त्यातूनच उद्याचे नेतृत्व निर्माण होणार आहे.

डॉ.विकास महात्मे म्हणाले, युवा पिढीला राजकारणामध्ये येऊन आमदार खासदार मंत्री व्हावे असे वाटते. परंतु त्या मागील कष्ट दिसत नाहीत. समाजातील तळागाळामध्ये गेल्याशिवाय लोकांचे दुःख आपल्याला कळत नाही. त्यांच्या समस्या आपल्याला समजत नाहीत. त्यांच्या समस्या कळण्यासाठी स्वतःच्या पलीकडे जाऊन जर त्यांचा विचार केला तर आपण निश्चितच एक यशस्वी राजकारणी होऊ शकतो.

अशोक नेते म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार आणि खासदार होण्याची संधी मिळाल्यामुळे मी सर्वसामान्यांचे दुःख जाणू शकलो. केवळ वैयक्तिक कारणासाठी राजकारणामध्ये येण्यापेक्षा समाजाचा विचार करण्यात अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही आपल्या पदाचा उपयोग समाजाच्या समस्या निवडण्यासाठी केला तर निश्चितच समाज तुमचा विचार करतो आणि तुम्हाला सामाजिक कार्यासाठी राजकारणामध्ये वारंवार संधी देतो.

भास्कर पेरे पाटील म्हणाले, महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता. जर गाव खेडे समृद्ध झाले तरच हा देश महासत्ता होणार आहे, या दृष्टीने तरुणांनी आमदार खासदार होण्याच्या नादी लागण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या गावामध्ये सरपंच होणे महत्त्वाचे आहे, जर तुम्ही गाव बळकट केले तरच खऱ्या अर्थाने देश प्रगतीपथावर जाऊ शकतो.

गणेश बिडकर म्हणाले, नगरसेवक होणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे. नगरसेवकाच्या कामाचा गौरव कधी केला जात नाही. त्यांना केवळ टीकेला सामोर जावे लागते. नगरसेवकाला कायम सहनशील असावे लागते, अशा नगरसेवकांची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले. यासाठी मी जाधवर ग्रुपचा अतिशय आभारी आहे.

दत्तात्रय धनकवडे म्हणाले, युवक ही देशाची शक्ती आहे लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचा राजकारणामध्ये सहभाग होणे अत्यंत आवश्यक आहे. युवकांनी त्यांच्या शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तरच त्यांचा समाजामध्ये वावर वाढेल आणि लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होईल.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, आपल्या अभिनव विचारांमधून देशाला दिशा देणारे युवक घडावे हा या संसदेमागील हेतू आहे. हा मंच कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही तर युवकांचा पक्ष आहे. वाड्या-वस्त्यांवरील तरुण राजकारणात येऊन व्यवस्थेचा भाग बनावेत आणि सक्षम व्यवस्था निर्माण झाली तर हे युवा संसद खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असे मी मानतो.

महत्वाच्या बातम्या-

Vijay Thalapathy | सुपरस्टार विजय थलपतीची राजकारणात एन्ट्री, पक्षाचीही केली घोषणा; पाहा लोकसभा लढवणार का?

Supriya Sule | …म्हणून देवेंद्र फडणवीसांची तक्रार सुप्रिया सुळे आता थेट अमित शाह यांच्याकडे करणार

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महेश गायकवाड यांची भेट, रुग्णालयात जाऊन प्रकृतीची केली विचारपूस