जागतिक पातळीवर गौरवलेले महाविकास आघाडी सरकार कपटाने पाडण्यात आले – जयंत पाटील

कोल्हापूर – महाविकास आघाडी (MVA) सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले, ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र कपटाने सरकार पाडण्यात आले अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी कोल्हापूर येथे केली.

फुटीर आमदारांच्या मतदारसंघात फिरून आल्यानंतर लोकांच्या मनात संतापाची लाट आहे असे सांगतानाच लोकं यांना धडा शिकवायला तयार आहेत. यांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आहे. हे आमदार निवडणुकांसाठी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा त्यांना खोक्यांचा हिशेब द्यावा लागेल असे स्पष्ट करतानाच अशा परिस्थितीत आपण आपला महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

ज्याला मुख्यमंत्री व्हायचे होते त्याला उपमुख्यमंत्री केले आणि ज्याला उपमुख्यमंत्री व्हायचे होते त्याला मुख्यमंत्री केले असा टोला लगावतानाच त्यांचा कारभार फक्त एका वर्षाचा आहे असे भाकीतही जयंत पाटील यांनी केले.

आपल्याला ताकदीने आपल्या विजयाची मोर्चेबांधणी करावी. आपली संघटना ताकदवान कशी होईल यासाठी प्रयत्न करावे. त्यामुळे इथे यश आपल्यालाच मिळणार असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीत कमीपणा घ्यावा लागत आहे. महाविकास आघाडी सरकारने वेदांताचा प्रकल्प खेचून महाराष्ट्रात आणला होता तो प्रकल्प आज या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गुजरातला गेला. इतरही प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून इतर राज्यात जात आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

आज महागाईमुळे नागरीक प्रचंड त्रस्त आहेत. बेरोजगारीमुळे तरुण मंडळी हैराण झाली आहे मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. या देशातील मीडियाही त्यावर प्रकाश टाकण्याची तसदी घेत नाही. मात्र काहीही झाले तरी सूर्य उगवायचा राहत नाही. त्यामुळे लवकरच परिवर्तन होईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.